citynewsMaharashtraNagpur

लोकनेते स्व. दत्ताजी मेघे यांच्या स्मारकाचे डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते अनावरण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती; कृषी महाविद्यालय, पशुवैद्यकीय रुग्णालय आणि स्मृती दालनाचे लोकार्पण

नागपूर / रामटेक : शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे लोकनेते स्वर्गीय दत्ताजी मेघे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मारकाचे अनावरण गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याच्या निमित्ताने रामटेक परिसराच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचेही लोकार्पण करण्यात आले.

दत्ता मेघे फाऊंडेशन आणि मेघे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय, शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालय आणि स्व. दत्ताजी मेघे स्मृती दालनाचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पांमुळे कृषी शिक्षण, पशुसंवर्धन आणि सामाजिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. दत्ताजी मेघे यांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा तळागाळापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याच्या पद्धती आत्मसात करण्यासाठी दर्जेदार कृषी शिक्षणाची आवश्यकता आहे. नव्या कृषी महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान मिळण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक उपचारपद्धती आणि पशुवैद्यकीय सुविधांचा विस्तार झाल्यास शेतकरी व पशुपालकांना मोठा लाभ मिळू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या माध्यमातून पशुधनाच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तर नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे रामटेकसह परिसरातील ग्रामीण भागाच्या विकासाला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

या सोहळ्याला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समीर मेघे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि सागर मेघे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

स्व. दत्ताजी मेघे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे नेणारे हे स्मारक आणि नव्याने सुरू करण्यात आलेले विकासप्रकल्प रामटेकच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

बाईट : राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

बाईट : सागर मेघे

सिटी न्यूजसाठी रामटेक येथून प्रतिनिधी अजय मेहरकुळे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button