सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बडनेरा रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी आणि पालकमंत्री बावनकुळे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत लोकार्पण; काही लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीची चर्चा
अमरावती | प्रतिनिधी
बडनेरा आणि अमरावती परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. जुन्या बायपास मार्गावरील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपूल अखेर सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.
बडनेरा शहरातील जुन्या बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे उद्घाटन आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला अमरावतीचे खासदार बलवंत वानखेडे, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार प्रवीण पोटे पाटील आणि आमदार बच्चू कडू अनुपस्थित राहिल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार रवी राणा यांनी खासदार बलवंत वानखेडे यांना दूरध्वनीद्वारे चार वेळा निमंत्रण देण्यात आले होते. मात्र ते पूर्वनियोजित विवाहसमारंभाच्या कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.
सुमारे सहा वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागरिकांना रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. वर्ष २०२० मध्ये प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली, तर २०२१ मध्ये प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली.
सुमारे ६५० मीटर लांबीच्या या उड्डाणपुलासाठी ६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र निधीची कमतरता तसेच विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे काम अनेकदा रखडले. विशेषतः अंतिम टप्प्यात निधीअभावी कामाचा वेग मंदावला होता. आवश्यक पाठपुराव्यानंतर प्रकल्प पूर्णत्वास गेला असून आता हा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे.
या उड्डाणपुलामुळे बडनेरा आणि अमरावती परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, रेल्वे फाटकावरील प्रतीक्षा टाळण्यास आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सुलभ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उड्डाणपूल सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी उद्घाटन सोहळ्यातील काही प्रमुख लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात कायम आहे.



