नवसारी चौकातील हल्ला प्रकरण उघड; दोन आरोपी अटकेत

गुन्हे शाखेची धडक कारवाई; एका आरोपीचा नागपुरीगेट फायरिंग प्रकरणाशीही संबंध असल्याचा पोलिसांचा दावा
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील नवसारी चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत अटक केली आहे. या कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचा नागपुरीगेट येथील गाजलेल्या फायरिंग प्रकरणाशीही संबंध असून तो त्या प्रकरणात फरार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी नवसारी चौकातील एका चहाच्या टपरीवर झालेल्या वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाले. या घटनेत व्यावसायिक नितेश तायवाडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर गाडगेनगर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे पथक तात्काळ तपासाला लागले.
गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून सापळा रचला. त्यानंतर झालेल्या पाठलागानंतर सैयद सोहेल उर्फ फज्जू आणि अब्दुल जरिब उर्फ शाहरुख या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान सैयद सोहेल हा नागपुरीगेट परिसरातील गाजलेल्या फायरिंग प्रकरणातही फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत. तसेच हल्ल्यामागील नेमके कारण आणि या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.



