BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार; बुलढाण्यात राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अशैक्षणिक कामांतून मुक्तता, टीईटी अटी रद्द व पदोन्नतीतील अन्याय दूर करण्याची मागणी

बुलढाणा | प्रतिनिधी

राज्यभर सुरू असलेल्या शाळा बंद आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शिक्षक संघटनांच्या शेकडो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत शासनाविरोधात घोषणाबाजी केली. अशैक्षणिक कामांमधून मुक्तता, टीईटी संदर्भातील अटी रद्द करणे, पदोन्नती प्रक्रियेत सुधारणा आणि शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय ताण कमी करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जिजामाता संकुल येथून मोर्चाला सुरुवात झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान शिक्षकांनी शासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.

आंदोलक शिक्षकांनी शाळाबाह्य आणि अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची तात्काळ मुक्तता करावी, टीईटी संदर्भातील अटी रद्द कराव्यात, पदोन्नती प्रक्रियेत होणारा अन्याय दूर करावा आणि शिक्षकांवरील वाढता प्रशासकीय भार कमी करावा, अशा प्रमुख मागण्या मांडल्या.

मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुलढाण्यातील शिक्षकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. जिल्हाभरातील अनेक शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्याने काही ठिकाणी शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले.

मोर्च्यानंतर शिक्षकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून शासनाने मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.

दरम्यान, राज्यभर शिक्षकांच्या विविध मागण्यांवर आंदोलनाची तीव्रता वाढत असून, शासन या मागण्यांबाबत कोणता निर्णय घेते, याकडे शिक्षकांसह पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button