नागपूर पोलिसांची मोठी कामगिरी; हरवलेले २२१ मोबाईल नागरिकांना परत

सीईआयआर पोर्टलच्या मदतीने सुमारे ५० लाख रुपयांचे मोबाईल शोधण्यात यश; तक्रार नोंदविण्याचे पोलिसांचे आवाहन
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत हरवलेले आणि चोरीला गेलेले २२१ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे ५० लाख रुपये असून, भारत सरकारच्या सीईआयआर (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या मदतीने ही कारवाई यशस्वी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोधरा, कलमना, पारडी आणि वाठोडा या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान सीईआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलच्या हालचाली आणि लोकेशनवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले.
मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड सक्रिय होताच संबंधित माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला प्राप्त होत होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून मोबाईल ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची पडताळणी करून मूळ मालकांना परत करण्यात आले.
ही यशस्वी कारवाई चारही पोलीस ठाण्यांच्या विशेष मोबाईल डिटेक्शन पथकाच्या तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
दरम्यान, नव्याने रुजू झालेल्या पोलिस आयुक्तांनी पारडी पोलीस ठाण्याला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास अनेक नागरिक तक्रार नोंदवत नाहीत. मात्र, प्रत्येक नागरिकाने तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी किंवा भारत सरकारच्या सीईआयआर पोर्टलवर मोबाईलची नोंदणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यामुळे मोबाईलचा गैरवापर रोखण्यास मदत होते आणि तो परत मिळण्याची शक्यता अधिक वाढते.



