एमपीएससी संयुक्त गट ‘क’ परीक्षा ऑनलाइन पद्धतीविरोधात वर्ध्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा

परीक्षा ऑफलाइन घेण्याची मागणी; टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व पारदर्शक परीक्षा प्रक्रियेचीही मागणी
वर्धा | प्रतिनिधी
एमपीएससी संयुक्त गट ‘क’ परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात वर्धा शहरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात निषेध व्यक्त केला.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, ऑनलाइन परीक्षेमुळे अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक आणि इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी आणि परीक्षा अधिक विश्वासार्ह पद्धतीने पार पडावी यासाठी संयुक्त गट ‘क’ परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी.
याशिवाय, टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने घेण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली.
या मोर्चात मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केले.
दरम्यान, संयुक्त गट ‘क’ परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार, याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणाकडून घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या मागण्यांची शासन आणि संबंधित यंत्रणा कितपत दखल घेते, याकडे राज्यभरातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.



