AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

बांधकाम पूर्ण, तरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद; नागरिकांचे खासदारांना खुले पत्र

बडनेरा जुनी बस्ती बायपासवरील रेल्वे उड्डाणपूल तातडीने सुरू करण्याची मागणी; वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

अमरावती | प्रतिनिधी

अमरावतीतील बडनेरा जुनी बस्ती बायपास रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही तो अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पूल बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी खासदार बलवंत वानखडे आणि राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांना खुले पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणपूल सुरू नसल्यामुळे दररोज हजारो वाहनधारकांना रेल्वे फाटकावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढत असून नागरिकांचा वेळ व इंधनाचा अपव्यय होत आहे.

या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच स्मशानभूमी असल्याने विद्यार्थी, पालक, रुग्ण, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकांना वेळेत मार्ग मिळत नसल्याने गंभीर परिणाम होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी बडनेरा जुनी बस्ती व परिसरातील नागरिकांनी खासदार बलवंत वानखडे आणि डॉ. अनिल बोंडे यांना खुले पत्र लिहून केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडे हा प्रश्न तातडीने मांडण्याची विनंती केली आहे.

पत्रात, “राजकारणापेक्षा जनहित महत्त्वाचे असून, पूर्ण झालेले सार्वजनिक काम नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे,” अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे. तसेच उड्डाणपूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रश्नावर संबंधित लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेतात, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. पूर्ण झालेला उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत नेमका कधी दाखल होणार, याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button