ब्रेकिंग न्यूज : कंचनीच्या महालाजवळ दुचाकी-पिकअपचा भीषण अपघात!

महिला गंभीर जखमी; पिकअप वाहन रस्त्यावर पलटी, दुचाकीचा अक्षरशः चुराडा
मेहकर | सिटी न्यूज | गजानन राऊत
मेहकर शहराजवळील कंचनीच्या महाल परिसरात मेहकर-जानेफळ मार्गावर दुचाकी आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारी महिला गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुचाकीवर महिला आणि पुरुष असे दोघे प्रवास करीत होते. हे दोघेही कोयाळी दहातोंडे येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
धडकेनंतर पिकअप रस्त्यावर पलटी
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कंचनीच्या महालाजवळ दुचाकी आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी होती की पिकअप वाहन रस्त्यावरच पलटी झाले, तर दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अक्षरशः चुराडा झाला.
या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. अपघातात जखमी झालेल्या महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट
दुचाकी आणि पिकअप वाहनाची धडक नेमकी कोणत्या परिस्थितीत झाली, अपघाताला कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जखमी महिलेची प्रकृती आणि अपघातासंदर्भातील पुढील तपशील मिळण्याची प्रतीक्षा आहे.
मेहकर परिसरातून सिटी न्यूजसाठी गजानन राऊत.



