ढोल-ताशांचा गजर, विद्युत रोषणाई अन् आतषबाजीचा झगमगाट! बडनेऱ्यात खाटू श्याम बाबांची भव्य निशाण यात्रा

तिलकनगर ते झिरी श्रीराम मंदिरापर्यंत भक्तीमय वातावरण; सुनील राणा आणि सौ. अनु राणा यांच्या हस्ते महाआरती
बडनेरा | प्रतिनिधी
खाटू श्याम बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त खाटू श्याम बाबा जन्मोत्सव समितीच्या वतीने बडनेरा येथे भव्य निशाण यात्रेचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, डीजेचा निनाद, आकर्षक आतषबाजी आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटात निघालेल्या या यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण बडनेरा नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
फुलांनी सजविलेल्या रथात खाटू श्याम बाबांची प्रतिमा
बडनेरा जुनी वस्ती परिसरातील तिलकनगर येथून निशाण यात्रेला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख चौकांतून मार्गक्रमण करीत ही यात्रा झिरी येथील श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचली. यात्रेत आकर्षक फुलांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये खाटू श्याम बाबांची मनमोहक प्रतिमा विराजमान करण्यात आली होती. यासोबतच प्रभू श्रीराम आणि पवनसुत हनुमान यांच्या प्रतिमाही भाविकांचे लक्ष वेधून घेत होत्या.
शेकडो भाविकांनी या यात्रेत सहभागी होत खाटू श्याम बाबांचा जयघोष केला. ढोल-ताशांच्या गजराने आणि भक्तिगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
सुनील राणा आणि सौ. अनु राणा यांच्या हस्ते महाआरती
यात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या महाआरतीचा मान युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा आणि सौ. अनु राणा यांना देण्यात आला.
यावेळी नगरसेवक अजय जैस्वाल, झोन सभापती किशोर जाधव, नगरसेविका रजनी डोंगरे यांच्यासह जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आकर्षक दीपज्योतींनी सजविण्यात आलेली महाआरती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली.
नेत्रदीपक आतषबाजीने उजळला शिवाजी महाराज चौक
महाआरतीनंतर करण्यात आलेल्या नेत्रदीपक आतषबाजीने छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर प्रकाशमय झाला. आकाशात उंच झेपावणाऱ्या रंगीबेरंगी आतषबाजीचा नजारा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
निशाण यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी मार्गावर ठिकठिकाणी चहा आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. महिला भाविकांचा लक्षणीय सहभाग हे या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. संपूर्ण मार्गावर भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
निशाण यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रेचे नियोजन शांततेत आणि उत्साहात पार पडले.
खाटू श्याम बाबांच्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि विद्युत रोषणाईच्या लखलखाटात पार पडलेल्या या भव्य निशाण यात्रेमुळे बडनेरा नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जन्मोत्सव समितीच्या नियोजनामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.



