Amravaticitynewslatestnewss breakingnews

अमरावतीत मुथूट फिनकॉर्पमध्ये ९ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार?

पाच किलो सोने आणि दोन कोटींची रोकड गायब असल्याचा लेखापरीक्षण अहवाल; शाखा व्यवस्थापकासह तिघांना अटक, सुमारे १५० ग्राहक प्रभावित

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती शहरातील विमको मनोरा परिसरातील मुथूट फिनकॉर्पच्या शाखेत तब्बल नऊ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कंपनीच्या अंतर्गत लेखापरीक्षणात सुमारे पाच किलो सोने आणि दोन कोटी रुपयांची रोकड गायब असल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणामुळे सुमारे १५० ग्राहक प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी शाखा व्यवस्थापक शुभम वासेवाय याच्यासह तिघांना अटक केली आहे.

कंपनीच्या अंतर्गत लेखापरीक्षणादरम्यान शाखेतील सोने आणि रोकड यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याचे समोर आले. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे पाच किलो सोने आणि दोन कोटी रुपयांची रोकड गायब असल्याचे अहवालात नमूद आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता पोलिसांकडून संबंधित आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात असून, नेमका गैरव्यवहार कशा पद्धतीने झाला आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा फटका सुमारे १५० ग्राहकांना बसल्याची माहिती आहे. अनेक ग्राहकांनी आपले सोने मुथूट फिनकॉर्पकडे गहाण ठेवलेले आहे. मात्र, शाखेतील गैरव्यवहाराची माहिती समोर आल्यानंतर ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गहाण ठेवलेले सोने कंपनीच्या ताब्यात असतानाही ग्राहकांवर व्याजाचा बोजा सुरूच असल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे सोने परत कधी मिळणार, तसेच या काळातील व्याजाबाबत कंपनी काय भूमिका घेणार, असे प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केले जात आहेत.

शाखा व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली असली, तरी ग्राहकांच्या सोन्याचे आणि पैशांचे नेमके काय झाले, हा महत्त्वाचा प्रश्न कायम आहे. ग्राहकांनी आता न्याय मागण्यासाठी कोणाकडे दाद मागावी, असा संभ्रमही निर्माण झाला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आर्थिक व्यवहारांची पडताळणी झाल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे. आता ग्राहकांना त्यांचे गहाण ठेवलेले सोने आणि आर्थिक नुकसान याबाबत न्याय कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button