पंढरपुरात गुढीपाडव्याचा उत्साह उसळला! विठुरायाला चंदन उटी, मंदिरात भव्य पुष्पसजावट; भाविकांची अलोट गर्दी.

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे भक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण पंढरी सजली असून पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.चंद्रभागा नदीत स्नान करून विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या श्रद्धेने मंदिरात दाखल होत आहेत. “टाळी वाजवावी, गुढी उभारावी… वाट ही चालावी पंढरीची!” या अभंगाच्या ओळींचा प्रत्यय आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे.या खास दिनानिमित्त मंदिरात आकर्षक आणि नयनरम्य फुलांची सजावट करण्यात आली आहे. रांजणगाव गणपतीचे विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने ही सेवा साकारण्यात आली. सजावटीसाठी पिंक डेझी, व्हाईट शेवंती, गुलाब, कामिनी यांसह झेंडू, अस्टर, गोंडा आणि जिप्सो अशा विविध फुलांचा वापर करण्यात आला आहे. पुण्यातील १५ कारागिरांनी रात्रभर मेहनत घेऊन मंदिरात सुंदर ‘पुष्पवाटिका’ उभी केली आहे.गुढीपाडव्याचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे विठुरायाची ‘चंदन उटी’ पूजा. वाढत्या उन्हापासून शीतलता मिळावी या भावनेतून विठ्ठल आणि रखुमाईला सुगंधी चंदनाचा लेप लावण्यास सुरुवात झाली आहे. चंदन उटी, सुवर्णालंकार, साखरेची गाठ आणि जरतारी पागोट्यामुळे विठुरायाचे रूप अधिकच लोभस आणि तेजस्वी दिसत आहे.तसेच, मंदिरातील धर्मध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. जालना, धाराशिव आणि राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरात दाखल झाले आहेत. “पाडव्याच्या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने वर्षभर समाधान मिळते,” अशा भावना भाविकांनी व्यक्त केल्या.दरम्यान, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. दर्शन प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी ‘ऑनलाइन दर्शन पास’ तात्पुरते बंद ठेवण्यात आले असून व्हीआयपी दर्शनावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.भक्ती, सुगंध आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळत असून पंढरपूरातील विठुरायाचा दरबार मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी तेजोमय झाला आहे.



