गुरुग्राममध्ये वाढदिवसाच्या पार्टीत विद्यार्थिनीवर अत्याचार; दिल्लीतील तरुण अटकेत

गुरुग्राम येथे वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान १९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दिल्लीतील २९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १४ मार्चच्या रात्री गुरुग्राममधील सेक्टर ३३ मधील एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये घडली. पीडित विद्यार्थिनी ही दिल्ली विद्यापीठमध्ये शिक्षण घेत असून ती एका मित्राच्या वाढदिवसासाठी दिल्लीहून गुरुग्रामला आली होती.
पार्टीमध्ये तिचे कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी आणि ओळखीचे लोक उपस्थित होते. दरम्यान, आरोपी दिव्यम (रा. रोहिणी, दिल्ली) हाही या पार्टीत उपस्थित होता. ओळख झाल्यानंतर त्याने विद्यार्थिनीच्या नशेच्या अवस्थेचा फायदा घेत तिला फ्लॅटमधील एका एकांत ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडितेने १५ मार्च रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुरुग्राममधील सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ६४(१) (बलात्कार) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



