Crime NewsLatest NewsMaharashtra

संगमनेरमध्ये सहावीतील विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला; आरोपी फरार, राज्यभर संताप

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरुणाकडून ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव पान परिसरात आज सकाळी शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी सायकलवरून घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवले आणि तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली. आरडाओरड ऐकून स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलीला प्रथम वडगाव पान येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूस, विशेषतः डोळ्याजवळील भागावर सुमारे ७ टक्के भाजल्याची दुखापत झाली आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून विविध पथके तयार करण्यात आली आहेत. मुलीचा जबाब आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, या अमानुष घटनेच्या निषेधार्थ वडगाव पान येथे ग्रामस्थांकडून रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button