City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूर मध्ये ७२ तासांत वाहनचोरीचा पर्दाफाश; आरोपी अटकेत, २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा एकदा चोख कामगिरी करत तीन चाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या ७२ तासांत अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला मालवाहू ऑटोरिक्षा आणि मोबाईल असा तब्बल २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


ही घटना यशोधरा नगर परिसरात १३ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली होती. अज्ञात आरोपीने मालवाहू ऑटोरिक्षा चोरी केल्याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ चे पथक १७ मार्च रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मानकापूर परिसरात पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम चोरीचा लाल रंगाचा मालवाहू ऑटोरिक्षा घेऊन कोराडी रोडच्या दिशेने जात आहे.

माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संबंधित वाहन अडवले. चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव शिवा उर्फ साहील दशरथ पारसे (वय २४, रा. यशोधरा नगर) असे सांगितले. वाहनाचे कागदपत्र विचारले असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.

सखोल चौकशीनंतर आरोपीने १३ मार्च रोजी यशोधरा नगर परिसरातून ऑटोरिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचासमक्ष कारवाई करत पोलिसांनी अंदाजे २ लाख रुपये किंमतीचा लाल रंगाचा मालवाहू ऑटोरिक्षा आणि आरोपीकडील मोबाईल असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील कारवाईसाठी यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


नागपूर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. गुन्हेगारांवर अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button