कामठी मध्ये पोलिसांची भव्य मॉक ड्रिल; सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेची तयारी

रामनवमी, रमजान ईद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर कामठी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. याच अनुषंगाने नवीन आणि जुनी कामठी पोलिसांनी संयुक्तपणे भव्य मॉक ड्रिल पार पाडली.
या मॉक ड्रिलमध्ये कामठी रेल्वे स्थानक समोर आंदोलक जमा होऊन जाळपोळ आणि घोषणाबाजी करत असल्याची कृत्रिम परिस्थिती निर्माण करण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे आणि प्रशांत जुमडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कारवाई केली.
सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव आक्रमक होताच सौम्य लाठीचार्जचा सराव करत जमावाला पांगवण्यात आले.
या मॉक ड्रिलमध्ये जखमी नागरिकांना तातडीने रुग्णवाहिकेत हलवण्याचा सराव करण्यात आला. तसेच अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.
यानंतर पोलिसांनी कामठी बस स्टँड, जयस्तंभ चौक आणि हैदरी मशीद परिसरात रूट मार्च काढला. या रूट मार्चद्वारे नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
या संपूर्ण सरावातून पोलिसांची सज्जता आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता स्पष्टपणे दिसून आली.
कामठी पोलिसांच्या या मॉक ड्रिलमुळे आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही शांतता आणि सहकार्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.



