Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत मध्यरात्री भीषण आग; ५ अग्निशमन गाड्यांच्या मदतीने दोन तासांनी आटोक्यात

अमरावती शहरातून मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आगीची घटना समोर आली आहे. राम लक्ष्मण संकुल मार्केट परिसरातील ‘श्री साई मार्केटिंग’ या दुकानाला आग लागून मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.


ही घटना १७ मार्च रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास अमरावतीतील राम लक्ष्मण संकुल मार्केट परिसरात घडली. ‘श्री साई मार्केटिंग’ या दुकानात अचानक आग लागल्याची माहिती जयप्रकाश वरदानी यांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला फोनद्वारे दिली.

माहिती मिळताच पाळी प्रमुख आणि केंद्रप्रमुख प्रेमानंद सोनकांबळे यांच्या आदेशानुसार अग्निशमन दलाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आगीची तीव्रता लक्षात घेता नियंत्रण कक्षातून अतिरिक्त मदत मागवण्यात आली.

अखेर अमरावती अग्निशमन सेवेच्या पाच गाड्यांच्या मदतीने सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या भीषण आगीत कन्फेक्शनरी साहित्य, टाटा एस वाहन, कॉम्प्युटर, टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे, दोन लॅपटॉप आणि फर्निचर जळून खाक झाले.

या आगीत अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या बचावकार्यामध्ये वाहन चालक तोसिफ शेख, संजय चव्हाण, राजकुमार खडसे, शेख अमीन तसेच फायरमन मनीष उताणे, राहुल घोडे, निखिल चौधरी, ताहीर शेख, श्याम भोपळे, मुजाहिद आणि यावले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि शौर्यपूर्ण कार्यामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button