रावेर पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ७ गाईंची सुटका

रावेर पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या सात गाईंची सुटका करण्यात आली आहे. मध्य प्रदेश सीमेजवळून चोरट्या मार्गाने गाईंना महाराष्ट्रमध्ये आणले जात असल्याची माहिती समोर आली होती.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सीमेलगतच्या शेडिया अंजन गावाकडून पाल गावाकडे सुकी नदीच्या पात्रातून गाईंना चोरट्या मार्गाने नेले जात होते. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ कारवाई केली.
पाल गावातील कृषी विज्ञान केंद्राजवळ आणि स्मशानभूमी परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपी जहांगिर हसन तडवी (वय ३६, रा. बोरव्हाल, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश) हा सात गाईंना काठीने मारहाण करत, कोणतीही चारा-पाण्याची सोय न करता कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळले.
पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून अंदाजे ५६ हजार रुपये किमतीच्या सात गाईंना सुखरूप वाचवले आणि त्यांना गोशाळेत दाखल केले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक कल्पेश आमोदकर करत आहेत.
रावेर पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे सात निरपराध जनावरांचे प्राण वाचले असून, बेकायदेशीर कत्तल प्रकरणांवर पोलिसांची करडी नजर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.



