युद्धाचा सराफा बाजारावर परिणाम! गुढीपाडव्याआधी सोनं-चांदी दरात मोठी उसळी

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता सराफा बाजारावर दिसून येत आहे. युद्धाचा आज १७ वा दिवस असून, गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. मात्र आज बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याने मोठा उच्चांक गाठला असून ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. २४ कॅरेटचे १ तोळा सोनं आज १,२०० रुपयांनी महाग होत १,५८,६२० रुपयांवर पोहोचले आहे. तर १० तोळा सोन्यासाठी आता तब्बल १५,८६,२०० रुपये मोजावे लागणार आहेत.
२२ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली असून १ तोळ्यासाठी १,४५,४०० रुपये मोजावे लागत आहेत. १० तोळा सोन्याच्या किमतीत ११,००० रुपयांची वाढ झाली असून हा दर १४,५४,००० रुपयांवर पोहोचला आहे.
याचबरोबर १८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. १ तोळा सोन्यासाठी १,१८,९७० रुपये खर्च करावे लागत असून १० तोळा सोन्याचा दर ११,८९,७०० रुपयांवर गेला आहे.
चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. १ ग्रॅम चांदी ५ रुपयांनी महागली असून १ किलो चांदीसाठी तब्बल ५,००० रुपयांची वाढ झाली आहे.
गुढीपाडवा अगदी जवळ आला असताना सोनं-चांदीच्या दरात झालेल्या या वाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात खरेदी करण्याचा बेत आखणाऱ्यांना आता अधिक खर्चाचा सामना करावा लागणार आहे. तज्ञांच्या मते, जागतिक तणाव आणि युद्धस्थिती कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.



