काळी जादूच्या संशयातून पत्नीची हत्या; आरोपीने मुलाला व्हिडीओ कॉलवर दाखवला मृतदेह

मुंबईत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काळी जादू केल्याच्या संशयातून पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने मुलाला व्हिडीओ कॉल करून आईचा मृतदेह दाखवल्याने या घटनेने अधिकच संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना मुंबईतील धारावी परिसरात घडली. अमृत सोलंकी (वय ५८) असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी सूरजबेन सोलंकी यांची हत्या केल्याचा आरोप आहे. अमृत सोलंकी हा पत्नीसमवेत धारावी येथे राहत होता, तर त्यांचा मुलगा शिवराम सोलंकी (वय ३३) हा मुलुंड येथे राहतो.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अमृत सोलंकी याने पत्नीवर काळी जादू करत असल्याचा संशय घेत वाद घातला. या वादातून त्याने संतापाच्या भरात पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. यावेळी त्याने तिच्यावर बाटलीनेही हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने मुलगा शिवरामला व्हिडीओ कॉल करून आईचा मृतदेह दाखवला. आईला काहीतरी झाल्याची भीती वाटल्याने शिवराम तातडीने मुलुंडवरून धारावीतील घरी पोहोचला. मात्र घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्याने वडिलांना फोन केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
यानंतर शिवरामने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात सूरजबेन सोलंकी यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अमृत सोलंकी याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



