मेळघाटात वृक्षारोपणावर प्रश्नचिन्ह; पाणी न दिल्याने रोपे वाळत असल्याचा आरोप

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यात वृक्षारोपणाच्या कामावरून संताप व्यक्त केला जात आहे. भर उन्हाळ्यात झाडे लावण्याचे काम सुरू करण्यात आले असून लावलेल्या रोपांना पाणीच दिले जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कुसुमकोट बुजुर्ग ते झील्पी साद्राबाडी रस्त्यावर सुरू असलेल्या या कामामुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग रोड ते झील्पी साद्राबाडी रोड या मार्गावर वृक्षारोपणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम भर उन्हाळ्यात सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, झाडे लावताना केवळ हातभर खड्डे खणून दोन हातांचे कुंपण उभारले जात आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे लावलेल्या झाडांना नियमित पाणी दिले जात नसल्याने अनेक रोपे अवघ्या दोन दिवसांत वाळायला लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या कामाबाबत कोणताही सूचना फलक लावण्यात आलेला नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे की सामाजिक वनीकरण विभागाकडून, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.



