अमरावतीत तापमानाचा पारा चढला; नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी काळजी घ्यावी – तज्ज्ञांचे आवाहन

अमरावती :
अमरावती शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सौम्या शर्मा चांडक आणि डॉ. विशाल काळे यांनी वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. महानगरपालिकेच्या माहितीनुसार, दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास डोके झाकण्यासाठी टोपी, कॅप किंवा ओढणीचा वापर करावा तसेच हलके सूती कपडे परिधान करावेत.
तसेच दिवसाभरात पुरेशा प्रमाणात पाणी पिणे अत्यंत आवश्यक असून ओआरएस, ताक, लिंबूपाणी आणि नारळपाणी यांसारखे द्रव पदार्थ सेवन करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. उन्हात काम करणाऱ्या मजुरांनी वेळोवेळी सावलीत विश्रांती घ्यावी.
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीस तात्काळ सावलीत हलवून पाणी द्यावे आणि आवश्यक असल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



