Latest NewsSolapur

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार; स्ट्रेचर तुटल्याने नातेवाईकांनी मृतदेह हातात घेऊन नेला

सोलापूर शहरातील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह नेत असताना स्ट्रेचर अचानक तुटल्याने नातेवाईकांना मृतदेह हातात घेऊन पुढे जावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश जगदीश कोळी (वय २४) हा तरुण भीमा नदीत पोहण्यासाठी गेला असताना बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला होता. मात्र मृतदेह स्ट्रेचरवरून शवविच्छेदन कक्षाकडे नेत असताना अचानक स्ट्रेचर तुटले. त्यामुळे उपस्थित नातेवाईकांवर मृतदेह हातात घेऊन पुढे नेण्याची वेळ आली.

या घटनेचा आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे मृत आकाश कोळी हा तरुण याच शासकीय रुग्णालयात कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. त्यामुळे या घटनेमुळे नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने तात्काळ व्यवस्था सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button