शिरजगाव मोझरी–जळका रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी ते जळका या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे नूतनीकरण न झाल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास सोमवारपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी ते जळका हा सुमारे १५.८ किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्याच्या तातडीने नूतनीकरण, रुंदीकरण तसेच पुलांची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या मागण्यांसंदर्भात शिरजगाव मोझरी, धोत्रा, सालोरा, शेंदोळा, जळका आणि माळेगाव या गावांतील नागरिकांनी तिवसा तहसीलदारांना निवेदन सादर केले. हा मार्ग परिसरातील सहा गावांसाठी मुख्य दळणवळणाचा मार्ग असून आसपासच्या सुमारे दहा गावांतील विद्यार्थी व नागरिक दररोज या रस्त्याचा वापर करतात. नागरिकांच्या म्हणण्यानुसार २०१२ नंतर या रस्त्यावर केवळ डागडुजीचे काम करण्यात आले, मात्र सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून वाहनांचे नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
याशिवाय या मार्गावर धावणाऱ्या एसटी बस वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात पोहोचण्यास उशीर होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच रस्त्यावर स्ट्रीट लाईट आणि सूचना फलक बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रस्त्यासाठी निधी मंजूर करावा, अन्यथा धोत्रा येथे सोमवार ९ तारखेपासून बेमुदत ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी दिला आहे.
दरम्यान, या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे. अन्यथा सोमवारपासून सुरू होणाऱ्या आंदोलनामुळे प्रशासनाची अडचण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



