राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर ३.५ तीव्रता

शनिवार (७ मार्च) रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदवण्यात आली. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा सर्वाधिक परिणाम सिकर जिल्हा आणि आसपासच्या भागात जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र जयपूरच्या वायव्य दिशेला सुमारे ६९ किलोमीटर अंतरावर आणि सुमारे पाच किलोमीटर खोलीवर होते.
सकाळी साधारण ६:३० वाजताच्या सुमारास हा भूकंप झाला आणि काही सेकंदांपुरताच त्याचा प्रभाव राहिला. खाटूश्यामजी, पलसाणा, धिंगपूर तसेच सिकर जिल्ह्यातील अनेक भागांत नागरिकांना हलके धक्के जाणवले.
भूकंपाचा धक्का जाणवताच काही ठिकाणी नागरिक घराबाहेर पडल्याचे सांगण्यात येत आहे. पलसाणा परिसरातील काही रहिवाशांनी भूकंपाच्या वेळी घरांचे दरवाजे आणि खिडक्या हलल्याचे सांगितले. मात्र भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणतीही मोठी हानी टळली आहे.



