खुन प्रकरणातील फरार आरोपी पिस्टल व काडतुसांसह अटक

नागपूरमधील यशोधरा नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत चंद्रपूर येथील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपीकडून पिस्टल, दोन काडतुसे, दुचाकी आणि मोबाईल असा सुमारे 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री पोलिसांनी धाडसी कारवाई करत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी प्रविण दिलीपराव जाधव आणि त्यांचे पथक यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, त्यांना गुप्त बातमी मिळाली की शांतीनगर पुलाखाली नामदेव नगर गार्डन समोर एक संशयित इसम अग्निशस्त्रासह फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंच आणि पथकाच्या मदतीने मध्यरात्री सापळा रचत रेड कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी किशोर पुंडलिकजी चानोरे वय 41 वर्ष, रा. वाठोडा नागपूर या आरोपीला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडून एकूण 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी आरोपीकडे अग्निशस्त्राचा परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे हा आरोपी चंद्रपूर जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3 आणि 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीची अधिक चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, यशोधरा नगर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



