औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव BMW कारची ट्रक व कंटेनरला धडक, चौघांचा जागीच मृत्यू

लातूर जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या BMW कारने लाकडाने भरलेल्या ट्रक आणि कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना शुक्रवारी रात्री सुमारे 10.15 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली येथील BMW कार (एमएच 04 ईजी 7500) काही कामानिमित्त लातूरला आली होती. काम आटोपल्यानंतर शिवली येथे जेवण करून सहकाऱ्याला सोडण्यासाठी ही कार औशाकडे जात होती. दरम्यान, औसा शहराजवळील एका हॉटेलसमोर पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रकला (एमएच 25 यू 0522) आणि कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) कारने मागील बाजूने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की लाकडाने भरलेला ट्रक सुमारे शंभर फूट पुढे जाऊन उलटला, तर BMW कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात चालक धनराज काशीनाथ जाधव (49, रा. सांगली), आबासाहेब साळुंके (36), शुभम शेषेराव पाटील (26) आणि किसन रामलिंग साळुंके (49, तिघेही रा. बोरगाव, ता. औसा) यांचा जागीच मृत्यू झाला.
तर जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हालदर (28, रा. सांगली) हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत धनराज जाधव हे सांगली येथील व्यापारी असून बोरगाव येथील तरुणांच्या मदतीने औसा तालुक्यासह जिल्ह्यात व्यवसायाचे जाळे उभारण्याचे काम करत होते.
घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे काही काळ औसा-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.



