BusinessLatest NewsMaharashtra

एलपीजी गॅस सिलिंडर महागले; घरगुती ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११५ रुपयांनी वाढ

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. घरगुती तसेच व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी नवीन दर जाहीर केले असून इंडियन ऑइलच्या वेबसाइटवरही ते अपडेट करण्यात आले आहेत.

१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८५२.५० रुपयांवरून वाढून आता ९१२.५० रुपये झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा गॅस प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि फूड स्टोअर्समध्ये वापरला जातो. त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रावरही या दरवाढीचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसचे दर जाहीर केले जातात. मात्र यावेळी ७ मार्च रोजी दरवाढ करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे सांगितले जात आहे. होर्मुज जलडमरू मार्गावर निर्माण झालेल्या तणावामुळे पुरवठा कमी झाला आहे. भारतात येणाऱ्या गॅसपैकी सुमारे ८० ते ९० टक्के गॅस या मार्गाने येत असल्याने त्याचा थेट परिणाम गॅसच्या किंमतीवर झाला आहे.

दरवाढीमुळे घरगुती ग्राहकांसोबतच हॉटेल व खाद्यव्यवसायालाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button