हवामानात मोठे बदल; उष्णता आणि दमट वातावरणासाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट

राज्यासह देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. कधी थंडी, कधी उष्णता तर कधी अवकाळी पावसामुळे नागरिकांसह शेतकरीही संभ्रमात पडले आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (IMD) ने काही भागांसाठी येलो अलर्ट जारी करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे रब्बी हंगामातील हाताशी आलेली पिके नुकसानग्रस्त झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. राज्यातील विविध भागांत अजूनही ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची स्थिती दिसून येत आहे.
दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात उष्णता आणि दमट वातावरण अधिक जाणवू लागले आहे. विशेषतः कोकण पट्ट्यात उष्णता आणि दमट हवामानाचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे या भागासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशातील तापमानाबाबत बोलायचे झाल्यास सिकार येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून येथे १२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे.
हवामानातील या सतत बदलणाऱ्या परिस्थितीमुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



