पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा रोष उफाळला; मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक राजीनाम्याचा इशारा

अमरावती (प्रतिनिधी) :
पशुवैद्यकीय सेवांमधील विविध प्रलंबित मागण्यांवरून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक राजीनाम्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
गुरुवार, ५ मार्च रोजी महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी पशुवैद्यकीय चिकित्सालयांचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणे सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० असे ठेवण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
तसेच राज्यभरात २४ तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिफ्ट पद्धतीने आवश्यक संख्येने पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेनुसार रिक्त असलेली सर्व पदे तातडीने भरावीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यासोबतच अनेक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला परिविक्षाधीन कालावधी समाप्त करून त्यांचे स्थायीकरण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. आस्थापना विषयक बाबी, वैद्यकीय बिले, रजा तसेच अतिरिक्त कार्यभार प्रदान करण्याचे अधिकार विकेंद्रीकरण करून ते जिल्हा व विभागीय स्तरावर देण्यात यावेत, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
दरम्यान, या सर्व मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेला सामूहिक राजीनाम्यासारखा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.



