नाकाबंदी तोडून भरधाव दुचाकीचा पोलिसावर हल्ला!

होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात धक्कादायक घटना समोर आली आहे. नाकाबंदी दरम्यान वाहतूक पोलिसाला भरधाव दुचाकीने धडक देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लकडगंज परिसरात घडली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दिनांक ३ मार्च २०२६ रोजी नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंद्रशेखर आझाद चौक येथे होळी व धुलीवंदन सणानिमित्त नाकाबंदी सुरू होती. वाहतूक शाखा लकडगंज येथील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप श्रीराव आपल्या पथकासह तैनात होते. त्यांच्यासोबत पोहवा संजय गिते, पोअं अनिल गहलोद आणि दोन महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, एमएच-४९ पी-३९५९ क्रमांकाची हिरो मायस्ट्रो दुचाकी डबल सीटवरून भरधाव आणि बेदरकारपणे येताना दिसली. पोलिसांनी तपासणीसाठी थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता थेट नाकाबंदीवर धडक दिली.
या धडकेत पोहवा संजय गिते गंभीर जखमी झाले. त्यांच्या हात, पाय आणि डोक्याला मार लागला असून त्यांना तत्काळ न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धडक दिल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित पोलिसांनी तत्परता दाखवत दोघांनाही ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे –
१) रूपेश किलेश्वर उईके, वय २३ वर्षे, रा. स्वातंत्र्य नगर
२) गौरव ज्ञानेश्वर चव्हाण, वय २१ वर्षे, रा. नंदनवन झोपडपट्टी
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींना धडक दिल्यास पोलिसाचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही त्यांनी संगनमताने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने ही कृती केली. या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.
होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक नाकाबंदी राबवली असताना अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत गंभीर बाब आहे. सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.



