अमरावती महापालिकेच्या आमसभेत वाद; नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांच्यावर सफाई कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याचा आरोप

अमरावती :
अमरावती महानगरपालिकाच्या अलीकडेच पार पडलेल्या आमसभेत एक गंभीर वाद उफाळून आला आहे. प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी सफाई कामगारांना उलट टांगून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या आमसभेत शहरातील वाढत्या अस्वच्छतेच्या मुद्द्यावर सर्व नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याच दरम्यान प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक ऋषिकेश देशमुख यांनी सफाई कामगारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप पुढे आला आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित नगरसेवकांनी “काम नीट केले नाही तर उलट टांगून मारू” अशी धमकी दिली. या कथित वक्तव्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ बुधवार, ४ मार्च रोजी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनच्या वतीने मनपा मुख्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी उपस्थित राहून त्यांनी महापौर श्रीचंद तेजवानी यांच्याकडे निवेदन सादर केले.
निवेदनात संबंधित नगरसेवकावर भारतीय न्याय संहिताच्या कलमानुसार तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
शहरातील अस्वच्छतेच्या प्रश्नावरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय आणि सामाजिक पातळीवर चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या आरोपांवर संबंधित नगरसेवकांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
सफाई कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याच्या आरोपामुळे अमरावती महानगरपालिकेतील वातावरण तापले आहे. या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणती कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



