अमरावतीत दुचाकी चोरीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेकडून विधीसंघर्षित बालक ताब्यात

अमरावती :
अमरावती शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका विधीसंघर्षित बालकाला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे. फेजरपुरा पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
अमरावती शहराचे मा. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी आयुक्तालय हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तपास सुरू केला.
फेजरपुरा पोलीस स्टेशन येथे कलम ३०५ (ब) भा.न्या.सं. अन्वये दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान ४ मार्च २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सुतगिरणी परिसरात एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन उभा आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून संबंधित विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
सदर बालकाकडे असलेल्या लाल-काळ्या रंगाच्या बजाज कंपनीच्या एनएस २०० पल्सर मोटारसायकलबाबत सखोल चौकशी केली असता, त्याने २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री अंदाजे १०.३० वाजता प्रशांतनगर चौकातील हनुमान मंदिराच्या पाठीमागील पानटपरीसमोरून ही दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून अंदाजे १ लाख ४० हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची पल्सर (२०० सीसी) मोटारसायकल जप्त केली. सदर गुन्हा उघडकीस आणून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित बालकाला फेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी अमरावती गुन्हे शाखेची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावी तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



