होळी–धुलीवंदनासाठी कडक पोलीस बंदोबस्त; नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नागपूर: नागपूर शहरात होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. धुलीवंदनाच्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सज्ज असून, कमर्शियल होळी इव्हेंट आयोजकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी केले आहे.
होळी आणि धुलीवंदन सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी शहर पोलिसांकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. प्रमुख चौक, संवेदनशील भाग तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
धुलीवंदनाच्या दिवशी मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी जबरदस्तीने रंग लावणे, धिंगाणा घालणे, ध्वनीप्रदूषण करणे किंवा महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
कमर्शियल होळी इव्हेंट आयोजित करणाऱ्या मंडळांसाठी परवानगी घेणे बंधनकारक असून, रात्री ठरलेल्या वेळेनंतर डीजे किंवा ध्वनीप्रक्षेपकांचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्थेची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
होळीचा सण आनंद, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारा आहे. नियमांचे पालन करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होळी साजरी करूया.



