मध्यपूर्वेतील तणावाचा विदर्भाला फटका; दुबईत यवतमाळ–वाशिमचे ११ नागरिक अडकले

यवतमाळ/वाशिम: अमेरिका–इराण तसेच इस्रायल–इराण यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता विदर्भातील नागरिकांवर होताना दिसत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आल्याने दुबई येथे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील एकूण ११ जण अडकले आहेत. नियोजित तारखेला परतीची फ्लाइट रद्द झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील पाच नागरिक सध्या दुबईत अडकून पडले आहेत. राजीव निलावार, राजू लोहाना, सतीश बनगिनवार आणि निखील जिरापूरे हे चौघे यवतमाळचे रहिवासी असून श्याम पाटील हे दिग्रस येथील आहेत. हे सर्वजण २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुबई येथे पोहोचले होते.
नियोजनानुसार २ मार्च रोजी भारतात परतण्यासाठी त्यांनी विमान पकडायचे होते. मात्र विमानतळावर पोहोचल्यावर त्यांची फ्लाइट रद्द झाल्याची माहिती मिळाली. मध्यपूर्वेतील तणावामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने त्यांना दुबईतच थांबावे लागत आहे. संबंधित सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती मिळत असली तरी त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने पर्यायी व्यवस्था करून त्यांना मायदेशी आणावे, अशी मागणी नातेवाईकांकडून होत आहे.
दरम्यान, रिसोड (जि. वाशिम) येथील पवन निर्बाण हे पत्नी नंदा निर्बाण, वडील भगवान निर्बाण आणि आई पद्माबाई निर्बाण यांच्यासह २४ फेब्रुवारी रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते. त्यांच्यासोबत धनज बुद्रुक येथील गोपाल जाजू व त्यांची पत्नी असे एकूण सहा जण होते. हे सर्वजण २८ फेब्रुवारी रोजी पुण्याला परतणार होते. मात्र इस्रायल–इराण संघर्षामुळे विमानसेवा बंद करण्यात आल्याने हे कुटुंब सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकले आहे.
हॉटेलजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने कुटुंब काही काळ भयभीत झाले होते. सध्या सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती पवन निर्बाण यांनी दिली आहे. मात्र लवकरात लवकर भारतात परतण्याची त्यांची इच्छा असून सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर होताना दिसत आहे. दुबईमध्ये अडकलेल्या विदर्भातील या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे आणि शक्य तितक्या लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



