India NewsLatest News

दिल्लीतील अनेक शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी; विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले

नवी दिल्ली (प्रतिनिधी): नवी दिल्ली येथील किमान तीन शाळांना सोमवारी सकाळी बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. धमकी मिळालेल्या शाळांमध्ये सरदार पटेल विद्यालय आणि सलवान पब्लिक स्कूल यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्ब निकामी पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

दिल्ली अग्निशमन सेवा (डीएफएस)च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस, बॉम्ब निकामी पथक, श्वान पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने शाळांकडे रवाना करण्यात आल्या. सध्या शाळा परिसरात सखोल तपासणी मोहीम सुरू आहे.

एहतियात म्हणून सर्व विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या शाळेबाहेर काढण्यात आले आहे. वर्गखोल्या, कॉरिडॉर आणि परिसरातील इतर भागांची बारकाईने तपासणी केली जात आहे. अग्निशमन विभागाला आतापर्यंत दोन शाळांकडून फोन आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. सरदार पटेल विद्यालय प्रशासनाने पालकांना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, “आज सकाळी शाळेला सुरक्षा संदर्भातील धमकी मिळाली. त्यानंतर आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी पोलीस शाळेत उपस्थित आहेत. सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.”

या घटनेनंतर शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस ई-मेल पाठवणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button