इस्रायल–इराण युद्धाचा परिणाम: भारतात २ दिवसांत ७६० हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द; अबू धाबीतील BAPS मंदिर ९ मार्चपर्यंत बंद

नवी दिल्ली/प्रतिनिधी: इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम भारतावरही जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत देशभरात ७६० हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आजही दिल्ली विमानतळ येथे ८७ उड्डाणे रद्द झाली.
दिल्ली, मुंबई, कोची, बेंगळुरू, चेन्नई, जयपूर आणि अहमदाबाद या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.
मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता BAPS हिंदू मंदिर ९ मार्चपर्यंत पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल–इराण संघर्षावर प्रतिक्रिया देताना पश्चिम आशियातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व देशांशी समन्वय साधून काम करेल, तसेच संवादातून तोडगा काढण्याच्या भूमिकेवर भारत ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील हैदराबाद हाउस येथे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर मोदी यांनी ही भूमिका मांडली.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर मध्ये सलग दुसऱ्या दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्यांवरून निदर्शने करण्यात आली.
श्रीनगर मधील बेमिना परिसरात सुरक्षाबळांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करत अश्रुधुराचा वापर केला. काहींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच शोपियां, बारामुला आणि बांदीपोरा येथे बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.
इस्रायल–इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर तणाव वाढला असून त्याचे पडसाद भारतातही उमटताना दिसत आहेत. पुढील काही दिवस परिस्थितीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



