AmravatiFestival NewsLatest News

होळी सणासाठी रंगली अमरावतीची बाजारपेठ!

होळी आणि धूलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि अमरावतीची बाजारपेठ रंगांनी न्हाऊन निघाली आहे. पिचकऱ्या, आकर्षक मास्क, टिमक्या, प्लास्टिकचे ताशे आणि विविध प्रकारचे रंग खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे लहान मुलांसाठी खास डिझाईनच्या पिचकऱ्यांनी बाजारात धूम केली आहे.

अमरावतीत होळी आणि धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ गजबजू लागली आहे. शहरातील मोची गल्ली, इतवारा, रंगारी गल्ली, नमुना गल्ली आणि गांधी चौक परिसरात होळीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. विविध रंगांच्या पिचकऱ्या बालचमूंना विशेष आकर्षित करत असून १० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत पिचकऱ्या उपलब्ध आहेत. यासोबतच आकर्षक मास्क १० ते ९०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

गुलाबी, निळा, जांभळा, भगवा, नारिंगी आणि पिवळा अशा रंगांसह नैसर्गिक आणि हर्बल रंगांनाही मोठी मागणी आहे. साडी कलर ४ रुपयांच्या पाऊचपासून, हर्बल कलर ९० रुपयांपर्यंत तर गुलाल १९० रुपये पाच किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्रामीण भागात पावडर कलरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने १५ ते २५ किलोच्या बॅगची मागणी वाढली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे सणावर मर्यादा आल्या होत्या. मात्र आता निर्बंध हटल्याने नागरिक उत्साहात खरेदी करताना दिसत आहेत. दुकाने रंग, पिचकऱ्या, टिमक्या आणि ताशांनी सजली असून संपूर्ण बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे.

होळीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीची बाजारपेठ रंगतदार झाली असून येत्या काही दिवसांत खरेदीचा हा उत्साह आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button