नागपुरातील पेपरफुटी प्रकरणाला गंभीर वळण; शिक्षकासह ५ जण अटकेत

नागपूर : नागपूर येथे उघडकीस आलेल्या पेपरफुटी प्रकरणाने शिक्षण व्यवस्थेलाच हादरा दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मोठी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली असून तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे.
तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. या प्रकरणातील सहावा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे हा सहावा आरोपी एका शाळेचा शिक्षक असल्याची माहिती पुढे येत आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीचे नाव या प्रकरणात समोर आल्याने प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले आहे.
दरम्यान, या रॅकेटमध्ये सातवा आरोपी अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात विद्यार्थी तसेच इतर काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणातील एका विद्यार्थ्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पेपरफुटीमागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



