BhandaraLatest NewsMaharashtra

शाळेच्या मैदानात रंगले पथनाट्य; विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उघडले नवे दरवाजे

भंडारा प्रतिनिधी :
भंडारा जिल्ह्यात सामाजिक न्याय योजनांची माहिती थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अनोखी जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. साकोली तालुक्यातील कुंभली येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभावी पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पुढाकारातून पार पडला. साकोलीचे सुप्रसिद्ध प्रबोधनकार भावेश कोटांगले आणि त्यांच्या टीमने गीत, अभिनय आणि प्रभावी संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मने जिंकली.

पथनाट्यातून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, बाबू जगजीवन राम छात्रावास योजना, स्वाधार योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि वस्तीगृह सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. शिक्षण, स्वप्ने आणि करिअरशी थेट संबंधित असलेल्या या योजनांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या व रंजक पद्धतीने समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत योजनांविषयी प्रश्न विचारले.

भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अशीच पथनाट्ये सादर करण्याचा मानस विभागाने व्यक्त केला आहे. समाजकल्याण योजनांचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button