Accident NewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोन मित्रांचा मृत्यू

रामटेक प्रतिनिधी (सिटी न्यूज):
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग वर सोमवारी (दि. 23) सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास कट्टा ते रामनगर दरम्यान भीषण अपघात घडला. देवलापार पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल दुभाजकावर आदळल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला.

मृतकांची नावे — पुनित उर्फ साजन ईमरतलाल कुडोपा (वय 27, रा. बमोडी, घनसोर, जि. सिवनी) आणि मोहित रामू खोडकर (वय 30, रा. साडगाव, ता. लाखनी). दोघेही मित्र असून नागपूरच्या मानेवाडा परिसरात एकत्र राहत होते. पुनित टाईल्स बसवण्याचे काम करत होता, तर मोहित रोजंदारीवर वाहन चालवत होता.

पहिला अपघात… आणि दुर्लक्ष

सिवनी येथील नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी दोघे एमएच 36 एएस 7460 क्रमांकाच्या मोटारसायकलने निघाले. मनसरजवळ त्यांचा पहिला अपघात झाला. दोघांनी स्वतः जाऊन प्राथमिक उपचार घेतले आणि डॉक्टरांनी नागपूरला रेफर केले. मात्र वैद्यकीय सल्ला न पाळता त्यांनी थेट सिवनीकडे जाण्याचा निर्णय घेतला.

दुसरी धडक ठरली जीवघेणी

मनसरवरून देवलापारकडे येत असताना कट्टा ते रामनगर दरम्यान गाडीने दुभाजकाला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की पुनितचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी मोहितला नागपूरला नेत असताना रस्त्यातच प्राण गमवावे लागले.

दोन्ही मृतदेह देवलापार ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ओळखपत्र नसल्याने सुरुवातीला ओळख पटवणे कठीण झाले; सोशल मीडियावर माहिती प्रसारित केल्यानंतर नातेवाईकांनी संपर्क साधून दोघांची ओळख पटवली.

देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पहिल्या अपघातातून बचावल्यानंतरही वैद्यकीय सल्ला न ऐकल्याने दुसऱ्यांदा नियतीने साथ सोडली… आणि दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

— अजय मेहरकुळे, सिटी न्यूज, रामटेक

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button