सावनेर तालुक्यात भीषण अपघात; स्कूल बसच्या धडकेत २० वर्षीय तरुण ठार

नागपूर | प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात घडला. स्कूल बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पेपर देण्यासाठी घरातून निघालेल्या युवकाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी खापा पोलीस स्टेशन हद्दीतील पंजाबखैरी परिसरात हा अपघात घडला. MH 36 AF 8621 क्रमांकाच्या दुचाकीवरून सिलेंडन बुद्दूलाल परतेती हा युवक पारसिवनी येथे परीक्षा देण्यासाठी जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या MH 40 Y 0780 क्रमांकाच्या स्कूल बसने त्याला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की युवकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आपल्या रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. डॉक्टरांनी तपासणी करून युवकास मृत घोषित केले.
मृत सिलेंडन परतेती हा सावनेर तालुक्यातील कोदेगाव येथील रहिवासी असून तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खापा पोलीस करत आहेत.
एका निष्पाप तरुणाचा जीव घेणाऱ्या या अपघातामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे किती महत्त्वाचे आहे, याची ही घटना गंभीर जाणीव करून देते.



