AmravatiamravatinewsLatest NewsMaharashtra

अमरावती मनपाचा जनसंवाद उपक्रम; प्रसिद्धीअभावी उपस्थितीवर प्रश्नचिन्ह

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी नागरिकांच्या थेट संवादासाठी ‘जनसंवाद व समस्या निवारण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचा उद्देश असलेल्या या उपक्रमाच्या प्रसिद्धीबाबत मात्र आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

अमरावती महानगरपालिका च्या इतिहासात पहिल्यांदाच नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी असा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जाते. राज्य सरकारच्या सूचनेनुसार नागरिकांच्या अडचणी जागेवर सोडवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, मालमत्ता कर, बांधकाम परवानग्या आदी विविध समस्या मांडल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून आवश्यक त्या कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.

मात्र या कार्यक्रमाची प्रसिद्धी प्रामुख्याने सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील मोठ्या नागरिकवर्गापर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचली नसल्याची भावना व्यक्त होत आहे. पुरेशी प्रसिद्धी झाली असती, तर मनपा कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली असती आणि प्रशासनाला अधिक प्रश्नांना सामोरे जावे लागले असते, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

तथापि, उपलब्ध माहितीनुसार अनेक नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आपापल्या समस्या मांडल्या. भविष्यात अशा उपक्रमांची व्यापक पातळीवर प्रसिद्धी करून अधिकाधिक नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा हा उपक्रम निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुढील जनसंवाद कार्यक्रम अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button