AmravatiLatest NewsMaharashtraSports

अमरावतीत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन; ३७२ खेळाडूंचा सहभाग

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती येथील बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात शानदार उद्घाटन पार पडले. स्वर्गीय श्वेता राकेश बडगुजर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल ३७२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून, अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी, अमरावती चेस असोसिएशन आणि श्री गाडगे महाराज महाविद्यालय, मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अकॅडमीच्या संस्थापक स्वर्गीय श्वेता राकेश बडगुजर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

उपमहापौर सचिन भेंडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून संयम, एकाग्रता आणि बुद्धिमत्ता विकसित करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. प्रत्येकाने चेस खेळाचा स्वीकार करावा, असा संदेश त्यांनी दिला.

उद्घाटन सोहळ्यास अकॅडमीचे सचिव डॉ. राकेश बडगुजर, स्पर्धा आयोजन समितीचे सचिव देवभाऊ शेंडे, समन्वयक गोकुळ कडू, टूर्नामेंट डायरेक्टर निहारिका कुलकर्णी, चीफ ऑर्बिटर प्रवीण ठाकरे, प्राचार्य डॉ. संतोषराव ठाकरे, अन्नाजी काळे, अमरावती चेस असोसिएशनचे सचिव पवन डोडेजा आणि उपाध्यक्ष प्रतीक घोघरे उपस्थित होते. तसेच बडगुजर अकॅडमी महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष दीपाली बेडबागकर, अध्यक्षा आरती शेंडे, सचिव स्वाती कडू आणि उपाध्यक्ष राणी ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार रवी राणा यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले. राज्यभरातून आलेल्या खेळाडूंमुळे अमरावतीच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ही स्पर्धा शहराच्या क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

राज्यभरातील बुद्धिबळपटूंच्या सहभागामुळे अमरावतीत बुद्धिबळाची चळवळ अधिक बळकट होणार आहे, यात शंका नाही. आगामी काळात अशा स्पर्धांमुळे शहराला राष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button