AmravatiamravatinewsCrime NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई; शेख शहबाज उर्फ मुरारी शेख कलीम स्थानबद्ध

अमरावती, प्रतिनिधी :
अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शहरातील कुख्यात व सराईत गुन्हेगार शेख शहबाज उर्फ मुरारी शेख कलीम (वय २५) याला MPDA Act अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा हा मोठा दणका मानला जात आहे.

झिब्राईल बाबा दर्गा परिसरात राहणारा शेख शहबाज हा सन २०१८ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरुद्ध नागपुरी गेट, खोलापुरी गेट आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, दुखापत, घरफोडी, राहत्या घरातील चोरी, अवैध शस्त्र बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, अश्लील कृत्य तसेच शांतता भंग अशा गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.

यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक तसेच तडीपारची कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याने पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला. ही कारवाई नागपुरी गेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनमंत उरलागोंडावार आणि पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंखे यांच्या प्रस्तावावर करण्यात आली.

गाडगेनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर तसेच परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली एमपीडीए सेलचे पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय मिश्रा, चेतन कराडे तसेच नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने प्रस्तावाची पूर्तता केली.

पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानबद्धतेचा आदेश पारित केला असून आरोपीला मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे दाखल करण्यात आले आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर विविध कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


अमरावती पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी काळात अशाच प्रकारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button