प्रभाग क्रमांक ६ मधील मसानगंज परिसरात नाल्यांवरील अतिक्रमणामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत येणाऱ्या मोरबाग, विलासनगर आणि गवलीपुरा परिसरातील मसानगंज भागात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर येत असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांसह सर्व नगरसेवकांनी भागाची पाहणी करत प्रशासनावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मसानगंज परिसरात नव्याने झालेल्या बांधकामांमुळे मोठ्या नाल्या बंद करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भागचंद बांबोरी यांच्या घरापासून नारायण मूल्य यांच्या घरासमोर तसेच बदली सरमन साहू यांच्या घरापर्यंत काही घरमालकांनी नाल्यांचे प्रवाह वळवून दुसऱ्या नाल्यात सोडल्याचे सांगितले जात आहे. परिणामी घाणीचे पाणी वारंवार मुख्य रस्त्यावर साचत असून परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे.
ही समस्या मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. पोटठेकेदार बबलू उर्फ संदीप गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा महापौर श्रीचंद तेजवानी आणि नगरसेवकांनी अनेकदा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, शाळा क्रमांक २ जवळील अभ्यासिकेची पाहणी करताना तेथे मंडप डेकोरेशनचे साहित्य कोणतीही मनपा परवानगी न घेता ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तसेच शाळेच्या मागील बाजूस अतिक्रमण झाल्याचेही निदर्शनास आले.
माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी पाण्याच्या टाकीसाठी मंजूर केलेला साडेसात लाख रुपयांचा निधी अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. जुनी हिंदी शाळा क्रमांक २ ते जलविहार हनुमान मंदिर दरम्यान नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे साफसफाई करणे कठीण होत असल्याचे ठेकेदाराने सांगितले. मात्र मनपाने पुढाकार घेऊन अतिक्रमण हटवून नाल्यांची तात्काळ स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नाल्यांवरील अतिक्रमण, रखडलेली विकासकामे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मसानगंज परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाहणीनंतर महापालिका ठोस कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



