नागपुरात १ किलोहून अधिक गांजासह तरुण अटकेत; पाचपावली पोलिसांची धडक कारवाई

नागपूर : नागपूर शहरात अंमली पदार्थ विक्रीवर पाचपावली पोलिसांनी मोठा प्रहार करत १ किलोहून अधिक गांजासह एका तरुणाला अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत ही कारवाई करण्यात आली असून मुख्य पुरवठादार अद्याप फरार आहे.
पाचपावली पोलीस ठाणे येथील डी.बी. पथकाने २० फेब्रुवारी रोजी रात्री कमाल चौक परिसरातील शनिचरा बाजार येथे सार्वजनिक ठिकाणी सापळा रचला. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार संशयिताला ताब्यात घेऊन पंचासमक्ष झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान आरोपीकडून १ किलो १९१ ग्रॅम गांजा आणि ३०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३० हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सौरभ रामस्वरूप असज्जा (वय २१, रा. कमाल चौक, नागपूर) असे आहे.
चौकशीदरम्यान आरोपीने हा गांजा गोंदिया येथील अग्रवाल नावाच्या इसमाकडून घेतल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याचा पीसीआर मंजूर करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
नागपूरमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. फरार आरोपीला कधी अटक होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



