अमरावतीत धाडसी घरफोडी; बंद घरातून १२ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून रविवारी रात्री राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. बालाजी प्लॉट, रिताराम बाबा मंदिर परिसरातील एका बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल १२ लाख ६४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, गीता उमाकांत यादव यांचे संपूर्ण कुटुंब लग्नसमारंभासाठी बाहेर गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी बंद घर हेरले आणि घरफोडी केली. घरातील सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १२ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून ठसे आणि इतर पुरावे गोळा करण्यात येत आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या गस्तीत वाढ करावी आणि चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
या घरफोडीच्या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.



