किरकोळ वादातून दोन भावांवर जीवघेणा हमला

नागपूर शहरात किरकोळ कारणावरून दोन सख्ख्या भावांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात यशोधरा नगर पोलीस ठाणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत पाच आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला. वाद चिघळल्यानंतर आरोपींनी दोन भावांवर धारदार शस्त्र आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या संदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून जलद आणि प्रभावी कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपींना अटक करण्यात यश आले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पुढील तपास सुरू आहे.



