AmravatiEducation NewsLatest News

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ४२ वा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला

माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे प्रमुख अतिथी; १६८ पारितोषिकांचे वितरण

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचा ४२ वा दीक्षांत समारंभ येत्या २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठ परिसरात भव्य स्वरूपात पार पडणार आहे. या समारंभासाठी देशाचे माजी लष्करप्रमुख मनोज पांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून गुणवंत विद्यार्थ्यांना तब्बल १६८ पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समारंभ

दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते भूषवणार आहेत. यावेळी निवृत्त माजी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे दीक्षांत भाषण करणार आहेत. तसेच डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि विविध विद्या शाखांचे अधिष्ठाता उपस्थित राहणार आहेत.

४५१ संलग्नित महाविद्यालयांद्वारे ज्ञानदान

विद्यापीठाच्या स्थापनेला यंदा ४३ वर्षे पूर्ण होत असून ४५१ संलग्नित महाविद्यालयांद्वारे ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. यापैकी ८ महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. बदललेले परीक्षांचे स्वरूप, सेमिस्टर पद्धती आणि वेळेवर लागणारे निकाल यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

१६८ गुणवंतांचा सन्मान

या दीक्षांत समारंभात विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना —
🏅 १२२ सुवर्णपदके
🥈 २२ रौप्यपदके
💰 २४ रोख पारितोषिके
असे एकूण १६८ पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

मुलींचे वर्चस्व ठळक

पदक विजेत्यांमध्ये मुलींचे वर्चस्व स्पष्ट दिसून येत आहे. ८५ पदक विजेत्यांपैकी ६७ मुली आणि १८ मुले असा समावेश असून जवळपास ८० टक्के पदके मुलींनी पटकावली आहेत.

नेहरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नेर येथील निकिता किशोर पुसणे हिने सर्वाधिक ६ सुवर्णपदके आणि एक रोख पारितोषिक मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच वाशिम येथील पल्लवी बाळकृष्ण राठोड हिला ५ सुवर्ण आणि १ रौप्य पदक, तर शेगाव येथील तेजस्विनी विठ्ठल भगत आणि अमरावती येथील साई ईश्वरी इंदुरकर यांनाही सुवर्णपदकांनी गौरविण्यात येणार आहे.

दरम्यान, काही पदकांसाठी पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्याची माहिती कुलगुरूंनी पत्रकार परिषदेत दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button