राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा सल्ला

राज्यातील हवामानात सध्या मोठा बदल पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर आता ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तापमानात चढ-उतार सुरू असून अनेक भागांत उन्हाचे चटके वाढले असतानाच भारतीय हवामान विभाग यांनी पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये सोमवारी व मंगळवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील तब्बल ११ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवारी अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह काही भागांत हलक्या सरी कोसळू शकतात. तर मंगळवारी सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारी नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांत अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली होती. जोरदार सरींमुळे कांदा, गहू आणि इतर हंगामी पिकांना फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
अवकाळी पावसाच्या या अंदाजामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला असून पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



